Latest News
बहे येथे महिलांच्या ग्रामसभेत डॉक्टर माधवी पटवर्धन यांचे आवाहन
बहे, ता. २८ : नदीच्या पोटामध्ये घातक रसायन मिसळल्यामुळे मेंदूचे आजार होतात, लिव्हरचे आजार होतात, कॅन्सर तर खूप मोठ्या प्रमाणावर दिसू लागला आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी आता महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे मत ‘चला… जाणूया नदीला’ या मोहिमेच्या कार्यकर्त्या डॉ. माधवी पटवर्धन यांनी व्यक्त केले.
बहे येथे महिलांच्या ग्रामसभेत डॉ. पटवर्धन या बोलत होत्या. सरपंच संतोष दमामे हे अध्यक्षस्थानी हे होते. ‘चला… जणूया नदीला’ या मोहिमेचे समन्वयक डॉ. मनोज पाटील, प्रमोद सुतार, अधिक मोहिते, कुमार सावंत, माजी उपसरपंच विजयमाला पाटील, वैशाली पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. माधवी पटवर्धन म्हणाल्या, नदीला आपण माई म्हणतो. तिची ओटी भरतो, तिची पूजा करतो; पण तिच्या पोटामध्ये घातक रसायने मिसळताना आपण का विचार करत नाही. नदीच्या पोटामध्ये घातक रसायन मिसळल्यामुळे मेंदूचे आजार होतात, लिव्हरचे आजार होतात, कॅन्सर तर खूप मोठ्या प्रमाणावर दिसू लागला आहे, हे आपण पाहतोच आहोत. महिलांनी ठरवल्यानंतर कोणतेच काम राहत नाही.
आता जर आम्ही या कामांमध्ये लक्ष घातले नाही तर आपल्या पुढच्या पिढीला जगणे मुश्कील होईल. प्लास्टिकचा अनिर्बंध वापर आणि त्याचे विविध प्रकारे नदीपर्यंत पोहोचणे हे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी अत्यंत घातक बनले आहे. त्यामुळे आता प्रक्षण रोखण्यासाठी आता महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे. डॉ. मनोज पाटील म्हणाले, ‘चला… जाणूया नदीला’ ही मोहीम किती व्यापक आहे आहे. ही मोहीम म्हणजे केवळ एक ‘इव्हेंट’ नाही ही एक ‘प्रक्रिया’ आहे. जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे.
घरोघरी जागृती व्हावी यासाठी तर प्रयत्न होतोच आहे. वाळवा तालुका बचत गटांच्या तालुका समन्वयक मनीषा ठाणेकर यांनी मार्गदर्शन केले. माजी उपसरपंच विजयमाला पाटील यांनी महिलांना उपयुक्त माहिती दिल्याबद्दल ‘चला… जाणूया नदीला’ या मोहिमेचे समन्वयक डॉ. मनोज पाटील व कार्यकर्त्या डॉ. माधवी पटवर्धन यांचे विशेष आभार मानले. यावेळी माजी उपसरपंच अर्चना दमामे, सदस्य मनीषा सुतार, शकुंतला थोरात, धनश्री थोरात, संगीता पाटील, शारदा पवार आदी उपस्थित होत्या. ग्रामसेवक अमर वाटेगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरपंच संतोष दमामे यांनी आभार मानले.