Latest News
छावा प्रतिष्ठानच्या नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद
छावा प्रतिष्ठानच्या नेत्रतपासणी शिबिराला प्रतिसाद
रत्नागिरी : सामाजिक बांधिलकी जपत अविरत काम करणाऱ्या छावा प्रतिष्ठान रत्नागिरीतर्फे गुहागर आगारात एस. टी. कर्मचाऱ्यांकरिता मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे जिल्हातील सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. आजच्या या वेगवान जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये तसेच एस.टी. कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ व सुरक्षित रहावे यासाठी छावा प्रतिष्ठान आणि नंदादीप नेत्रालय यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एस.टी. कामगारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संघटक व गुहागर आगाराचे वाहक समीर धावडे, रवींद्र पवार (स्थानक प्रमुख), संतोष ढोके (वरिष्ठ लिपिक) व सर्व कर्मचारी उपस्थित होते.