Latest News
ज्येष्ठ नागरिकांची 'नंदादीप' तर्फे मोफत नेत्र तपासणी

कोल्हापूर : नंदादीप नेत्रालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी योजनेचे उद्घाटन करताना ज्येष्ठ नागरिक संघाचे मान्यवर.
सांगली, ता. ७ : नंदादीप नेत्रालयातर्फे कोल्हापूरमध्ये ३१ डिसेंबर अखेर ५५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आवश्यक तपासण्या आणि उपचार सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर सर्किट हाऊस येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुबुळतज्ज्ञ डॉ. प्रसन्न आराध्ये, डॉ. स्नेहा शिंदे, डॉ. ऋचा पाटील, नेत्रपटलतज्ज्ञ डॉ. सचिन देसाई, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते. डॉ. प्रसन्न आराध्ये यांनी डोळ्यांच्या तपासणीबाबत मार्गदर्शन केले. डॉ. स्नेहा शिंदे यांनी मोतीबिंदू व काचबिंदू या आजारांबाबत माहिती दिली. डॉ. सचिन देसाई यांनी मधुमेह असलेल्या नागरिकांना पडद्याच्या तपासणीचे महत्त्व पटवून दिले. नागरिक संघाचे प्रमुख लक्ष्मण डूके यांनी ‘नंदादीप’च्या या कार्यक्रमाचे कौतुक केले. व्यवस्थापक रवींद्र मोहिते म्हणाले, या योजनेत ३१ डिसेंबरपर्यंत ५५ वर्षांवरील सर्व नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.