Latest News
नंदादीपमध्ये जागतिक नेत्रतज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद
PhacoTips 6.0 निमित्त जगभरातील नेत्रतज्ज्ञ एकत्र; शस्त्रक्रिया प्रशिक्षण, ज्ञानाची देवाणघेवाण आणि नाविन्यपूर्ण डिजिटल साधनांचे लोकार्पण.
सांगली : नंदादीप मेडिकल केअर फाउंडेशन आणि नंदादीप फॅको ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित PHACOTIPS 6.0 या आंतरराष्ट्रीय फॅको प्रशिक्षण परिषदेला देश-विदेशातील नेत्रतज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपचारपद्धती यांवर आधारित ही परिषद भारतासह विविध देशांतील नेत्रतज्ज्ञांसाठी ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली.
परिषदेदरम्यान प्रात्यक्षिक शस्त्रक्रिया, तांत्रिक चर्चासत्रे, क्लिनिकल अनुभवांचे सादरीकरण तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांच्या व्यवस्थापनावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये अमेरिकेतील, ब्राझील, बेल्जियम आणि मेक्सिकोसह विविध देशांतील नामांकित नेत्रतज्ज्ञांनी सहभाग नोंदवत आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्यांचा अनुभव सहभागी डॉक्टरांशी शेअर केला.
या परिषदेत विकसित करण्यात आलेल्या ‘अँगल अल्फा पॅटवर्धन अॅप’ आणि PhacoTips.com या डिजिटल शैक्षणिक व्यासपीठाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे नियोजन अधिक अचूक आणि प्रभावी करण्यासाठी विकसित करण्यात आलेले हे अॅप नेत्रतज्ज्ञांसाठी उपयुक्त ठरणार असून आधुनिक नेत्रशिक्षणाला नवी दिशा देणारा उपक्रम मानला जात आहे.
नंदादीप आय हॉस्पिटलचे संस्थापक व ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन, संचालक डॉ. सौरभ पटवर्धन आणि डॉ. निधी पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या परिषदेमुळे आधुनिक नेत्रचिकित्सा, संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्राला नवी चालना मिळाली. भविष्यातही अशाच शैक्षणिक उपक्रमांद्वारे गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि कौशल्यविकासाला प्राधान्य देण्याचा नंदादीपचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले.